दिनांक १० जुलै २०२५ रोजी अरिहंत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कॅम्प, पुणे येथे महाविद्यालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. अशोक चासकर आणि प्रभारी प्राचार्या डॉ. कांचन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळांतर्गत संयुक्तीकरित्या ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करण्यात आली.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ‘विशेष व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले. व्याख्यानास प्रा. प्रदीप कदम (प्राचार्य कॉनक्वेस्ट महाविद्यालय चिखली) हे प्रमुख व्याख्याते लाभले. मानव्यविद्याशाखेच्या विभागप्रमुख डॉ.राधाराणी बॅनर्जी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. व्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून ऐतिहासिक दाखल्यांच्या आधारे ‘गुरु -शिष्य’ परंपरा आणि गुरूंचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान यावर प्रकाशझोत टाकला. तसेच गुरुचे सामाजिक महत्त्व, विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे त्याग आणि नम्रता इत्यादी गुणविशेष आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनामध्ये गुरूंचे असणारे मोलाचे स्थान याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. राधाराणी बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व याविषयी मौलिक विचार मांडून अध्यक्षीय समारोप केला.
‘गुरुपौर्णिमा दिना’ निमित्त महाविद्यालयाकडून गुलाब पुष्प देऊन सर्व प्राध्यापकवृंदांचा सन्मान करण्यात आला. प्रा. शांतेश्वर वाघमारे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन केले. तसेच प्रा. डॉ. हर्षल चलवादी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते यांचा व्यक्तिपरिचय करून दिला. महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख तसेच विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. रमजान वारुणकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी उपस्थिती दर्शवली.





