अरिहंत कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, कॅम्प, पुणे यांच्या NSS युनिटतर्फे दिनांक २९ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत म्हातोबाची आळंदी, ता. हवेली, जि. पुणे येथे सात दिवसीय NSS विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील ६५ NSS स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांचन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. अशोक चासकर, शैक्षणिक संचालक, अरिहंत एज्युकेशन फाउंडेशन यांच्या प्रेरणेतून करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. हर्षल चलवादी, NSS कार्यक्रम अधिकारी यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
सात दिवसांच्या शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान, श्रमदान, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, ग्रामस्थांशी संवाद, पथनाट्य आणि जनजागृती रॅली अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी ग्रामीण जीवन, शेती, नर्सरी व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन तसेच मल्हारगड येथे स्वच्छता व गडसंवर्धन उपक्रम यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
शिबिरादरम्यान व्यक्तिमत्त्व विकास व NSS, पाणी अडवा–पाणी जिरवा, शाश्वत विकास व ग्रामीण विकास, राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांचे योगदान आणि जलव्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली. तसेच AI चा सामाजिक प्रभाव, इंटरनेट आणि आपण, समाजावर सामाजिक माध्यमांचा प्रभाव यांसारख्या समकालीन विषयांवर गटचर्चा घेण्यात आल्या.
समारोप कार्यक्रमामध्ये म्हातोबाची आळंदीच्या सरपंच सोनाली जावळकर तसेच माजी सरपंच व ग्रामस्थांनी NSS स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले. स्वयंसेवकांनी शिबिरातील अनुभव तसेच ग्रामीण भागातील नागरिकांकडून मिळालेले प्रेम आणि सहकार्य याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
या सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिरामुळे NSS स्वयंसेवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, संघभावना, स्वावलंबन आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ झाली. विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि ग्रामीण विकासाशी संबंधित उपक्रमांनी समृद्ध असे हे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.

